पूर
पूर
पुराने ओल्या केलेल्या
भिंतीतील ओल
अद्यापही कायम आहे
पूरग्रस्तांची एक पिढी सरून गेली तरी
नव्या पिढीतील
चिल्ल्यापाल्यांच्या डोळ्यात
पूर साचून आहे
गावाच्या गल्लीतून अजूनही
येतो वास मृत्यूचा
त्या रात्री झोपली होती
कुणी गजरा घालून
त्या सैल अंबाड्यातील फुलांचा
निजल्या देहात शिरले होते
पाणी अनाहूतपणे
राहिला शृंगार, राहिली नीज
श्वासामागून श्वासांचे गुदमरणे
गेला जीव पाहता,पाहता
पिशाच्च होऊनही परतला नाही
इतक
ा धसका नदीमायचा
जलप्रपाताचा
भास ओसरला नाही
तरंगत आले होते
कोवळे बालगोपाळ
तरंगत आली बुढी आजी
रामरक्षेच्या वेळी डोळे पुसायचे जे
तरंगताना दिसले तेही दाजी
भातुकली वाहून गेली
किडुकमिडुक वाहून गेले
पळभरात नदीने
सारे मोह उतरविले
विजेच्या तारांवर लटकली होती
साडी, चिंधी काही लुगडी
काही जोड्या,काही शव
नवविवाहितेची बुगडी
वासरू गमावलेली गाय
आभाळाकडे बघून हंबरते
अजूनही त्या गावात
काळे मेघ दिसता
भुई शहारते