आठवण पावसाची
आठवण पावसाची
एक सांज रिमझिम पाऊस तो पडला
ओली चिंब केली त्याने सारी धरा
आला असा मृग नक्षत्राचा पाऊस बघा
अन् धरेवर पाऊस पडला छान बरा
सोसाट्याचा वारा वाहत असल्याने
रानी-वनी तांडव नृत्य झाले वृक्षांचे
इकडून तिकडे पाला-पाचोळा उडाला
फार गोंधळ उडाले रस्त्यावर लोकांचे
नभी चालला ढगांचा तो कडकडाट
आकाशी विजेचा ही तो चकचकाट
टपटप थेंबांची रांगोळी सजली धरेवर
गारांचा ही चालला मध्येच थयथयाट
शिवारी बघा बळीराजा सुखावला किती
सवंगड्या सोबत शिवार कामी लागला
त्याच्या आवडत्या ढवळ्या पवळ्या संग
शेताची मसागत नि नांगरणी करू लागला
पावसामुळे डोंगर कपारीतुनी वाहू लागले
वरून झरझर लहान मोठे झरे शुभ्र पाण्याचे
इवल्या कोंबांनी अवनी ही सजली नटली छान
नवी नवेली नवरी नेसुनी शालू हिरव्या बुट्यांचे
पावसाळ्यात रिमझिम पाऊस तो बरसावा
मुलांसंग मन सोक्त पावसात चिंब भिजावे
वय नि स्वतःस विसरुनी रिमझिम पावसात
छान गाऊनी मुलांसंग मस्त मस्त ते नाचावे
अशा ओल्या पावसात साथ मज सख्याची
मग मस्ती,आनंद नि मजा ती किती वर्णावी
असे मेघाने बरसतच जावे रिमझिम सारखे
अंग अंग ओली नि मस्तीभरी सांज असावी