गजरा
गजरा
स्पर्श तुझ्या वेणीचा होताच, तुला भाळायचा गजरा
जेव्हा एकांताच्या रात्री, सखा माळायचा गजरा
तू नटायची मराठमोळी, नेसून पैठणी नऊवारी
लाजत, मुरडत, ठुमकत, मनाला छळायचा गजरा
धुंद गारव्यात, कोसळतांना रिमझिम पाऊस सरी
अंगा - प्रत्यंगात लावून प्रेमाची आग, जाळायचा गजरा
आवडे मजला तुझे ते झिडकारणे आणि रागावणे
खूप संतापल्यावर, चिडल्यावर तू , नजर टाळायचा गजरा
शांत क्षणी, डुंबायचो डोहात आपण प्रणयाच्या
गुप्तता ती आपल्या मिलनाची पाळायचा गजरा
मिठीत घेता तुला, रोमा-रोमात यायचा शहारा
गाली चढायची लाली, लाजून चूर-चूर व्हायचा गजरा
बोल मनाला टोचता, अश्रू झरती डोळ्यांतूनी
काळोखात गुपचूप, आसवे गाळायचा गजरा