जिंकायला
जिंकायला
खेळण्याआधी हरण्याचा सराव करून घे
लक्षात ठेव तू, मला आवडते फक्त जिंकायला
लागत नाही जगायला आणखी काही
तुझी आठवणही पुरते आयुष्य काढायला
पळत राहिली मी फक्त स्वप्नांच्यामागे
कुणी शिकवेल का मला मजेत चालायला ?
तू तर डोक्यात घुसून बसलास माझ्या
तुला सांगितले होते मी हातात हात पकडायला
लोकांसाठी खोटी पण तुझ्यासाठी खरी होते
तुझे काय जात होते मला आपले मानायला
आधी होते, आज आहे, कायम असणार प्रेम तुझ्यावर
मला खूप आवडते तुझ्याशी असे बोलायला
आधीच म्हटले होते की, पिंजरा आहे मी
तुला सांगितले होते कुणी माझ्यात अडकायला ?
मुक्याने बोलणे आधी सोडून दे तू
उभे आयुष्य आहे दुःख शब्दात मांडायला
तुझ्यासोबत आणि तुझ्यानंतरही असणार मी
आहे विठ्ठल माझा मला तारायला