मी कोरडी...
मी कोरडी...
न केलेल्या गुन्ह्यासाठी
मी फोडते खडी
मी कोरडी... मी कोरडी... ॥धृ॥
पुढे डोकावताही येत नाही
मागे वळून बघताही येत नाही
बसून राहते तासन् तास मी
घालून हाताची घडी... ॥१॥
सोडून दिले परमेश्वरावर
जेवढे होते जंगम स्थावर
चालण्याचा रस्ता सरळ आहे पण
माझ्या नशिबाची रेषाच वाकडी... ॥२॥
कधी शिकणार मी दुनियादारी
सोडून लाचारी, कधी होणार व्यवहारी
खाऊन-पिऊन कसे राहायचे सुखात
शिकवतात मला लोके मरतुकडी... ॥३॥
स्विकारावा लागला नियतीचा प्रस्ताव
विसरून गेले चांदण्यांचा गाव
रोज उसवत जाते आपोआपच
कितीदा शिवावी फाटकी गोधडी... ॥४॥
मन लागत नाही इथल्या पसाऱ्यात
जाईन म्हणते दुसऱ्या विश्वात
हे अंतरिक्षातल्या विश्वासू सरदारांनो,
पाठवाल का मला न्यायला तबकडी... ॥५॥