"गुलमोहर"
"गुलमोहर"
होता एक साक्षीला,
वृक्ष गुलमोहराचा.
उभा कित्येक दशकांपासून
काही पाऊलांच्या अंतराला!
साथी असे सुख दु:खाचा,
क्षणोक्षणी मनोबळ देणारा.
साथ ही नेली हिरावून,
एका पाषाणह्रदयी पामराने
अन् पोरकेपणाचा
मनाला भास झाला.
सांजवेळी सळसळत्या पानांनी
एकाकी मनाला
आता डोलविणार कोण?
वाटले दुपारच्या उन्हातही
मंद वा~याच्या झुळुकेसह
मनातील व्यथेला
शीतलता आता देणार कोण?
थकून भागून घरी आल्यावर
मनाला टवटवित करणारी
छाया आता देणार कोण?
सकाळी उठल्यावर
बहरल्या फुलांनी
शुभप्रभातीचा प्रथमसंदेश
देणार कोण?
अंतरी ओलावा आणून
अंगणी फुलांचा सडा
आता शिंपडणार कोण?