चढ उतार
चढ उतार
धुंद धुक्यात बुडालेला
झाडाच्या दाटीवाटीत हरवलेला
एक वळणावळणाचा रस्ता
वर वर चढत जाणारा आणि
खाली खाली घेऊन येणारा
झाडांच्या शिवाय इथं
कुणाचीच गर्दी नाही
पण मी हा चढ रोज चढतो न् उतरतो
एक दिवस कुठूनतरी आवाज आला
आवाजाच्या दिशेनं पाहत असतानाच
आवाज आला
" रोज रोज जातोस न् येतोस
पण सापडला का रे तुझा रस्ता "
आपसुकच माझ्या तोंडातून उत्तर निघालं
" तासन् तास चालतो
छाताडात श्वास भरून घेतो
शोधत राहतो
कधी सापडतो तर कधी नाही
पण नव्यानं शोधत राहतो
नवा बोध घेत राहतो
नवं शिखर गाठत राहतो
पण मुक्कामाचं ठिकाण सापडलच काही नाही "
उत्तराच्या अपेक्षेने क्षणभर ताटकळलो
पण उत्तरही धुक्यातच हरवलंय
माझा संवादही अर्घवटच राहिला
त्याच्या उत्तरांच्या अपेक्षेने
रोज हा चढ चढतो
रोज उतरतो
कधीतरी हा आमचा संवाद पुर्ण
होईल या वेड्या आशेने
