इर्हा तानंचा आसरा
इर्हा तानंचा आसरा
सुकलेल्या नदीमायेत
बाप इर्हा खनते
तानेल्या नजरे,माय वंझळीन
पानी हांड्यात भरते
बाप इर्हा खनते......।।
मनासंग आटल्या इर्ही
नाही थेंब गावामंदी पाण्याचा,
भल्या पायटी इर्हीवर
चाले गदारोळ आयाबायाचा
पाहून त्यायले, जीव अंधाराचा गुदमरते...।।
पाण्यासाठी डोया,कायजात
पाणी कसं खारावलं,
वंझयभर पाण्यासाठी
नातं,नात्याले भांडलं
पाण्यानं आज कशी, माणूसकी भाजते....।।
पानी डोयात,पानी कायजात
पानी लपलं,पांढऱ्या ,पांढऱ्या ढगात
पानी लपून चोरून दुरूनच पायते
पापनी मायची कोड्डया, पदराआड भिजते...।।
पान्यासाठी जीव आज
पानी पानी झाला
कायजाच्या कोंट्या-कोंट्यातून
बांध अश्रूचा फुटते...।।
नायी समजली निसर्गाले
मानसाच्या वागण्याची तर्हा
पडू दे चांदणं फटफट आभाई
बापा तू असाच खन इर्हा.......।।