तू आता अंगार हो
तू आता अंगार हो
यौवनाच्या धुंदीत जगाला विसरतेस
तू जेव्हा नटून थटून रस्त्याने चालतेस
रूपावर तुझ्या भाळून, रस्ताही पाहतो वळून
वखवखलेल्या नजर तुझा पाठलाग करतात ,
तेव्हा...
खरंच सांग सखे,
धरशील भरवसा कुणाचा?।।१।।
बांधून तुझ्या हाताने राखी रक्षाबंधनाला
रक्षणाची शपथ घेऊन डोळेही सजवणारा,
भाऊबीजेला ओवाळणीही घालणारा,
तुझ्या अब्रूरक्षणार्थ काळाशीही लढणारा
भाऊच तुझ्या अब्रुवर घालतोय आज घाला,
तेव्हा......
खरंच सांग सखे,
धरशील भरवसा कुणाचा?।।२।।
जगातील सर्वश्रेष्ठ कन्यादान करणारा,
जन्मदात्याचा हात प्रेमाने कुरवळणारा
वात्सल्याने, प्रेमाने डोईवरून फिरणारा
प्रेमळ, आश्वासक, वरदायक मंगल हात
वासनेने बरबटून सर्वांगावरून फिरू ला
गतो
तेव्हा....
खरंच सांग सखे,
धरशील भरवसा कुणाचा?।।३।।
तू ज्याची मुलगी आहेस तो तुझा पिता नाही
तू ज्याची बहीण आहेस तो तुझा भाऊ नाही
तू ज्याची पत्नी आहेस तो तुझा पती नाही
ते आहेत फक्त वासनांध पशू तू फक्त मादी
वासनांधांच्या दुनियेत तू फिरतेस
तेव्हा......
खरंच सांग सखे,
धरशील भरवसा कुणाचा?।।४।।
मान ज्यांच्या खांद्यावर विश्वासाने टाकावी
अशा बंधू पित्यानेच का अब्रू तुझी लुटावी?
राजमाता जिजाऊ तू, झाशीची राणी तू
दुर्गा हो, चंडी हो, महिषासूर मर्दिनी हो
रणरागिणी तूच बन, तूच तुझे कर रक्षण
तू आता कुऱ्हाड हो, दुधारी तलवार हो
तू आता अंगार हो!!!
तू आता अंगार हो !!!
तू आता अंगार हो!!! ।।५।।