माय मही
माय मही


काय सांगू बाप्पा मह्या मायची करणी ।
सय मायची र येता येई काळीज भरुनी ।।१।।
माय मही सुगरण रांधे कोंड्याचाही मांडा ।
हुशारीनंच वढला तिनं परपंचाचा गाडा ।।२।।
शाळामंदी कधी गेली मह्या माईलाच ठाव ।
मह्या मायकून न्यान शाळा मास्तरानं घ्यावं ।।३।।
गीता, गाथा, न्यानेसरी न्हाई कधी वाचायाची ।
वही गीतेची, गाथेची तिच्या मुखी नाचयाची ।।४।।
अख्ख्या जगाच्या देवता मह्या माईच्याच ठायी ।
कोन्ह्या धामाले जायाची मले गरजच न्हाई ।।५।।
रात रातीला जागली मह्या साठीच झिजली ।
सांगा तिच्या रिणातून कसं व्हवू उतराई? ।।६।।
हात जोडून मागणं, देवा, यवढं दान देई ।
मह्या माईच्या रं पोटी मला पून्ना जल्म देई ।।७।।