ताईचे प्रेम
ताईचे प्रेम


ताई तुझ्या गं प्रेमाचा
कसा होऊ उतराई
तुझ्या मनाची थोरवी
दिसतसे सर्व ठायी ।।१।।
माय शेतात राबते
ताई घर सांभाळते
माय बनून आमची
किती काळजी वाहते ।।२।।
सण रक्षा बंधनाचा
आहे पवित्र नात्याचा
भाऊ ताईच्या प्रेमाला
पुन्हा दृढ करण्याचा ।।३।।
धागा नाजूक रेशमी
ताई बांधते भावाला
भावासाठी दीर्घ आयु
स्वास्थ्य मागते देवाला ।।४।।
जरी गेली दूरदेशी
चित्त तिचे बंधूपाशी
रक्षाबंधन सणाला
वेगे येई माहेराशी ।।५।।
माया ममता आईची
भावंडाना देते ताई
तिच्यामुळेच कळते
ईश्वराचे रूप आई ।।६।।