पेरणी
पेरणी
आला मृगाचा पाऊस
चिंब न्हाहली धरणी
शेतकरी आनंदाने
करू लागतो पेरणी ।।१।।
सर्जा राजा बैलजोडी
बांधलेली दावणीला
पीक पेरावया साठी
जुंपतसे तिफणीला ।।२।।
तिफणीला बांधी चाडे
झोळी एक रुमण्याला
बीज पेरता पेरता
साद घालतो देवाला ।।३।।
सर्व जगात भरोसा
देवा तुझाच राखतो
लेकरांच्या मुखातले
दाणे भूमीत टाकतो ।।४।।
मुलं, बाळं, बैलं, गायी
पशू, पक्षी, झाडे, वेली
साऱ्यांचीच चिंता तुला
सोय ज्यांची त्यांची केली ।।५।।
देतो एकाचे हजार
देवराया माझ्या ओटी
माथा चरणी ठेऊन
नमस्कार कोटी कोटी ।।६।।