राजा कोहिनुर जसा
राजा कोहिनुर जसा
हिऱ्यामधी जसा हिरा, बाई कोहिनुर जसा।
अन तसा आमचा राजा शिवबा, रयतेचा जसा।।धृ।।
स्वाती नक्षत्रात मोती, जन्म शिंपल्यात घेती।
जसे जिजाऊंच्या पोटी, शिवराय जन्मा येती।।
जमून मेळा मावळ्यांचा, गड किल्ल्यांवरती।
बंधू प्रेम जागविले मनी, गरीब जनते वरती।।
असा माझा राजा इथं, राज्य चालवितो कसा।
अन सर्वधर्म साथ घेई वाटे, माय-बाप जसा।।१।।
तोरणा घेऊन शिवबाने, स्वराज्या बांधले तोरण।
रायरेश्वरी शपथ घेऊन, त्यांनी पुरी केली आण।।
गेली वार्ता जगामधी, लई झाला बोल-बाला।
मोगल-आदीलशाहीत, सारा गोंधळ उडाला।।
देश-धर्म,राष्ट्र प्रेम शिवबा मनी, जागवित कसा।
साधू-संत,सुफी-फकीर मानी, इथं देवदूत जसा।।२।।
चोर-गुंड, डाकू कोणी जर, करती दादागिरी।
हात-पाय तोडून शिवबा, त्यांचा कडेलोट करी।।
फितूर झाले स्वकीय जरी, गेले मोगल दरबारी।
गनिमी कावा करून, त्यांना तिथल्या तिथं मारी।।
असा राजा रयतेचा, बाई दिसतो आज कसा।
जगामधी कीर्ती त्यांची, हिरा कोहिनुर जसा।।३।।