आनंद या जीवनी सुगंधापरी दरवळा
आनंद या जीवनी सुगंधापरी दरवळा


मला राहून - राहून वाटतं...
उगाच मी मन मारून जगत आलो ...
अन लोक काय म्हणतील ?
याचाच विचार करत आलो ...
खूपदा वाटतं ...सालं जगायचंच राहून गेलं
जगावं बिनधास्त स्वच्छंदी , मनसोक्त ...
तसं ठरवतो ही पण क्षणभर पण कसलं काय ..
पुन्हा तेच पांढरपेशी मानसिकता दुसरे काय ?
लोकांचं काय असंही बोलतात तसंही बोलतात
आपल्याच सोयीनुसार इतरांना तोलतात ...
मला राहून - राहून वाटतं ...नकोच ते रटाळ जिणं
टीचभर पोटा
ची खळगी भरण्यास एवढी पायपीट करणं ..
हरेक नात्याला न्याय देत चालत आलो इथवरी
कळेचना मज काही, का मग ही भिक्षांदेही ...
मला राहून - राहून वाटतं ...संघर्ष अटळ पण ...
जीवघेणा खडतर प्रवास, कुठवर अन का तरी ?
मला राहून - राहून वाटतं संपेल हा वैशाखवणवा..
पुन्हा बहरेल पाने - फुले , नवचेतना जागवेल तन- मना
फक्त एवढी अभिलाषा.. माणूसपण जिवंत असू दे रे ...
देवा ! आनंद या जीवनी सुगंधापरी दरवळावा ..