अन्नदाता
अन्नदाता
माझा बाप शेतकरी
भर रानात राबतो
उभ्या जगाचा पोशिंदा
अन्नदाता म्हणावितो
छातीवरल्या घामाची
कधी केली ना फिकीर
जगवितो जगाला या
तरी राहिला फकीर
खाली भुई निजयला
वर नभ पांघरतो
लेतो अंगावरी चिंध्या
तरी समाधानी होतो
काय सांगू तुला दोस्ता
माझ्या बापाची चाकरी
दिनरात कामधंदा
खातो मिरची भाकरी
किती सण आले गेले
बाप रमतो कामात
जग दिवाळी करते
बाप भिजतो घामात