माझी आनंदाची गोधडी
माझी आनंदाची गोधडी
माझी आनंदाची गोधडी
झाली थोडी तोकडी
डोक्यावरून पांघरली
पायाकडून राहते उघडी
आनंदाच्या गोधडीला
सगळे रंग जोडलेले
बारीक बारीक शिवणीतून
मन सर्वाचे तोललेले
आनंदाच्या गोधडीला
विचारांचा रेशमी धागा
संस्कारांची शिवण.
आनंदच वाटा कोणी कसही वागा
एकेक वेगळ्या रंगाचा
सुबक सुंदर शिवायचा
संसाराच्या वाटेवर
आनंदच वाटायचा.
आनंदाच्या गोधडीला
सात रंगाचे ठिगळ
आपण हसू वाटायचे
कोणी कसाही वागले.
आनंदाची गोधडी
माय न मायेनं शिवली
घरातल्या प्रत्येकाची
मन तिच्यात गुंफली
तोकडी असूदे पण
जणू आई पाहे प्रेमानं
तिला आहे मायचा पदर
शिवला तिन मायेनं
अशी माझी गोधडी
जिव्हाळ्याची पांघरते
आईची ग माया सारी
गोधडीतून पाझरते!