कविते!
कविते!


*कविते*
कधी तरी अचानक
सय मला येते तुझी
वही पेन घेतो हाती
रेखाटतो मूर्ती तुझी
कुणा आवडो नावडो
माझी मला आहे प्यारी
माझ्या मनाच्या भावना
हळूवार जपणारी
कधी कारूण्याची देवी
धरी शौर्य रूप कधी
झरा वात्सल्याचा वाहे
जशी खळाळून नदी
गोड अंगाई गाऊनि
मला कधी शांतविते
कधी मधूर भूपाळी
गाते, मला जागविते
भासे तुझ्या संगतीत
सारी प्रेममय सृष्टी
देते कर्तव्याची जाण
माझी बदलते दृष्टी
सजा काळ्या पाण्याची गं
जेव्हा विनायका झाली
तुझ्या संगतीनं त्यानं
आनंदान ती भोगिली
अशी कशी मोहिनी तू
माझ्या घातली जीवाला
घर संसारा मधूनि
जीव माझा गं उडाला
तुझ्या रूप सौंदर्याची
जादू माझ्यावर झाली
पत्नी म्हणते कोठून
मला सवत आणली?
असा कसा गं लागला
तुझा खुळा नाद मला
तुझ्या नादानं कविते
जीव माझा वेडावला