छत्रपती शिवराय
छत्रपती शिवराय
ज्याचा जन्म आणि मृत्यू
गडावरीच जाहला
राजा शिवाजीशिवाय
दुजा कुणी हो पाहिला ?
माझ्या राजाच्या स्वराज्यी
होते शेतकरी सुखी,
राजा धावून जातसे
कुणी दिसताच दु:खी.
सातबार्याची पद्धत
शेतसारा जमिनीचा,
जगी सुरु करणारा
राजा पहिला बाणीचा.
वेतनाची संकल्पना
मूळ शिवाजी राजाची,
कामे उत्तम व्हावया
दिली बोनसही साची.
'पाणी अडवा जिरवा'
माझ्या राजाची योजना,
'झाडे लावा नि जगवा '
होते बिंबविले मना.
उभ्या राज्यात नव्हता
कुणी याचक भिकारी,
राज्य दुजे ना जगती
प्रजा कामोकामी सारी.
राजांचिया दरबारा
जिथे नाचती ललना,
परस्त्रीस मानी माता
तेच सांगतसे जना.
राजांसाठी बलिदाना
होते आतुरले जन,
दुष्टांसाठी होता काळ
आप्त मानिती सज्जन.
राजा एकच जगती
ज्यास रयतेचा ध्यास,
देशोदेशी सालोसाल
चाले तयाचा अभ्यास.