उठ तरुणा
उठ तरुणा


उठ तरुणा, नव्या दमाने या देशाची साद तुला ।
या देशाच्या संस्कृतीचे रक्षण करणे आहे तुला ।।
आठव ते बलिदान वीरांचे देशासाठी प्राण दिले ।
गोऱ्यांच्या जुलमी बेड्यांतून ज्यांनी तुला स्वातंत्र्य दिले ।।
झेलल्यात त्या गोळ्या ज्यांनी हसतमुखाने छातीवर ।
ओवाळून टाकिला आपुला प्राण ज्यांनी या मातीवर ।।
त्या वीरांचे रक्त तुझ्याही धमन्यांमधुनी सळसळते ।
अत्याचार अन्याय बघून का चित्त तुझे ना खवळते? ।।
सीमेच्या पलीकडून अजूनही शत्रूचा हल्ला होतो ।
शीर हाती घेऊनिया सैनिक सीमेचे रक्षण करतो ।।
सीमेचे नच भीती बाळगू ओळख आतील शत्रूला ।
वासना, षडविकार त्यागुन जपावे मानव धर्माला ।।
भ्रष्टाचाराने आतून केले पोकळ इथल्या संस्कृतीला ।
वासनांधता फार वाढली सोयरसुतक नच कोणाला ।।
नारीचे जिथे पूजन होते, तिथे देवता वास करी ।
जपण्या ऐशा संस्कृतीला संकल्प करुनि ध्यास धरी ।।