येता श्रावणाचा मास
येता श्रावणाचा मास
येता श्रावणाचा मास, सण उत्सवाचा खास।
सडा सारवण करी माय, मनी माहेरची आस।।
येता श्रावणाचा मास...
रिमझिम पावसात, येते आठवण बाई।
मंगळागौरीच्या सणाला, लेक माहेरस येई।।
येता पावसाची सर, येतो भरूनीया उर।
माय-लेकीच्या प्रेमाला, येतो श्रावणात भर।।
या गं श्रावण मासात, दर सोमवारी खास।
शंकराच्या पिंडीवर, बेल पानांची आरास।।
येता श्रावणाचा मास....
सण नागपंचमीचा येतो, श्रावण मासात।
लाह्या दूध ठेवी माय, नागोबाच्या गं पूजेत।।
झिम्मा फुगडी खेळतो, भोंडला दारात रंगतो।
झोका झाडाला बांधून, उंच आभाळीत जातो।।
राखी भावाला बांधते, लागे रक्षाबंधनाची आस।
दीर्घ आयुष्य मागते, माझ्या भावाला गं खास।।
येता श्रावणाचा मास....
श्रावण कृष्ण अष्टमीला, बाळकृष्ण जन्म घेई।
दहीहंडी फोडून, लोक गोपाळकाला करी बाई।।
या गं श्रावण मासात, रानमळे हिरवीगार।
शेतकऱ्याच्या मळ्यात पीक डोले वाऱ्यावर।।
बारा मासामधी मास, लई श्रावणाचा खास।
सान-थोरांना लागते, श्रावण सरींची गं आस।।
येता श्रावणाचा मास....
