एक श्रावण असा यावा............
एक श्रावण असा यावा............


एक श्रावण असा यावा
आयुष्याचा उत्सव व्हावा
वारा चहू दिशांतून
घन झरझर देहभर पाझरावा
रिक्त रिक्त तन वसुंधरेचे
तटिनीसवे तृप्तीचा मेघ झरावा
एक श्रावण असा यावा
आयुष्याचा उत्सव व्हावा
नभ गात्रांतून अनंत चपला
धमन्यातून सळसळत पसराव्या
अर्धोन्मेलीत नेत्रांनी मग
पियुषरस आकंठ प्यावा
एक श्रावण असा यावा
आयुष्याचा उत्सव व्हावा
पांघरता मेघस्पर्शाची मखमल
अधीर अधीर आसमंत व्हावा
लज्जित जराशी धरा जाहता
कणाकणाने प्रणय राग गावा
एक श्रावण असा यावा
आयुष्याचा उत्सव व्हावा
उचंबळूनी येई हृदय नभाचे
धरित्रीच्या कुशीत ओलावा
मंद धुंद हे पिठूर चांदणे
सृजनाचा प्रेमांकुर फुलावा
एक श्रावण असा यावा
आयुष्याचा उत्सव व्हावा
एक श्रावण असा यावा
आयुष्याचा उत्सव व्हावा..