विठ्ठला येई दर्शनाला
विठ्ठला येई दर्शनाला
माझ्या पंढरीतून निघालो तुझ्या पंढरीला ।
नको पाहु अंत विठ्ठला येई दर्शनाला ॥ धृ ॥
शेतावर राबुन झाले शरीर हे क्षीण
परी तुझ्या भेटीसाठी आतुरले मन
आलो पायी घेऊन संगे माझ्या रखमाईला ।१।
दुष्काळाची माळ देवा पडली यंदा गळा
कसा पुसू कपाळीचा गरिबीचा टिळा
कनवटी रिकामी भाकरी आणली नैवेद्याला ।२ ।
एखादी भिमा चंद्रभागा गावाकडे धाड
एक तरी सर माझ्या वाळवंटी पाड
पालखीत बसुदे त्या ज्वारी बाजरीला ।३।
तुझ्या रिंगणाचा घोडा किती डौलदार
माझी गायी बैलं झाली भुकेनं बेजार
तुका नामाची बी पोटं गेली खपाटीला ।४।
माझ्या पंढरीतून निघालो तुझ्या पंढरीला।
नको पाहु अंत विठ्ठला येई दर्शनाला ॥ धृ ॥