मातीतल्या बीयाला
मातीतल्या बीयाला
साधाच प्रश्न केला मातीतल्या बीयाला
का?उगतोस बाबा पुन्हा येथे मरायला
उगलास की तू..
येतो अंगावर काटा
रात्र रात्र लागत नाही
डोळ्याला डोळा..
कितीही पेरलं तरी
हाती फक्त बोळाच..
इथे माझेच मला उमजत नाही
त्यात तुझा घोर..
भरवश्यावर तुझ्या अजून उजवली नाही पोर
सांभाळताना तुला भरडला जातोय मी अस्मानी सुल्तानी शुक्लकाष्ठाने
एवढेही करुन जगला वाचलास की
टपूनच असतात लांडगे कळपाकळपाने...
मग पोटच्या गोळ्याची पाहून तगमग
माझाही सुटतो धीर
तू कमावता होण्याच्या आशेवर कोसळते वीज.
तेव्हा ऐक माझं
रहा गपगुमान पडुन
होउ दे बोम्बाबोंब
उसळू दे आंगडोंब
तसही तुझं कोण करतं मोल
जो तो लावतो तुझी बोली
बिन भावानच साजरी करावी लागते येथे दिवाळी अन होळी
तेव्हा हो बिनधास्त एखाद्या निष्पाप पाखराच्या चोचीतला दाणा..
सांगु दे त्याला तुझ्या न येण्याची कहानी जगाला
येवू दे तुझी आत्महत्या रोखल्याचं पुण्य फळाला ....