तो दिवस अन् ती गर्दी...
तो दिवस अन् ती गर्दी...
कित्येक घटना घडून गेल्या
पण तो दिवस वेगळाच होता
यावेळी नेमका यम सणाला
पुलावरच वाट पाहत होता ..
निसर्ग तर आधीच कोपलेला
अतिवृष्टीलाही महिनाच झालेला
त्यातून उभं राहता राहता
पुन्हा पुलावरून पाय घसरला ..
एकाचवेळी लोकल आलेल्या
तिन्ही ठिकाणचा लोट उसळला
प्रत्येक पायरी उतरेस्तोवर
पुलही राक्त्बंबाळ झालेला..
खरतर फक्त फुलंच पडलेली
पुल तर भितीने मनाचा कोसळला
काय घडतंय कळेस्तोवर
काळानेच क्षणात डाव साधला ..
काय दुर्दैव त्या मुलाचं
बाबासाठी वाट पहायचा
नियमित जाणारा त्याचा बाबा
त्यादिवशी मात्र कायमचाच गेलेला ..
आई होती कुणाची त्यात
कुणाचा कर्ता मुलगा
पर्वा नव्हती कुणाची कुणाला
प्रत्येकाला आपला जीव प्यारा ..
पाऊस काही थांबत नव्हता
आकांडतांडवही सुरूच होता
स्वार्थी व्यक्ती छत्रीतून तरी
व्हिडीओ टिपण्यातच मग्न होता..
तरी अनेक वाचले असते
फक्त फोन ठेवण्याची गरज होती
रक्त द्यायला ही अनेक होते
पण आधाराचीच कमी होती ..
यापुढेही पाउस पडेल
पुन्हा अशीच गर्दी होईल
मला मात्र प्रत्येक स्टेशनवर
आता तीच गर्दी सतावत राहील
तीच गर्दी सतावत राहील .........