छत्रपती शिवाजी राजे
छत्रपती शिवाजी राजे
तळपता सुर्य मराठ्यांचा
उगवला शिवनेरी गडावरती,
जिजाऊच्या पोटी जन्मला
महाराजा शिवाजी छत्रपती.
मावळ्यांचा सखा सोबती
लढला स्वराज्यासाठी,
होता जिजाऊचा वरदहस्त
आई भवानीचा आशिर्वाद पाठी.
अभ्यास करुनी शस्त्रांचा
घेतले पराक्रमाचे धडे,
स्थापन्या हिंदवी स्वराज्य
शपथेवर उचलले विडे.
हर हर महादेव सिंह गर्जनेत
सारी मातृभुमी दुमदुमली,
भल्याभल्या शत्रूंची फौज
त्यांनी चिलटासम चिरडली.
चमचमती पाती तलवारीची
कडाडली विजेपरी चौफेर,
असो कोणताही रणसंग्राम
मानली नाही त्यांनी हार.
कधी आक्रमण तर कधी
केले तह करार हुशारीने,
दगाबाज, फितुर शत्रूंना
केले नामोहरम चातुर्याने.
लढले शत्रुंशी धैर्याने
रक्तरंजित क्रांती करुनी,
सळो की पळो झाले शत्रू
नमले शिवबापुढे झुकूनी.
जपले पर स्त्रीला त्यांनी
माता भगिनी समजूनी,
गड किल्ले जिंकले शौर्याने
गनिमी काव्यने युद्ध करुनी.
खचलेल्या रयतेच्या मनी
केला जागृत स्वाभिमान,
गांभिर्याने करुन प्रयत्न
राखला राजभाषेचा मान.
सलाम माझा या शुरवीरा
नतमस्तक होऊन मी पुजते,
जोडून कर वंदन करुनी
गोडवे अभिमानाने गाते.