पाऊस
पाऊस
उन्मादाच्या स्वारीवर
आरुढ होणारा झिणझिणता पाऊस...
ओघळढगातून निसटलेला ओलसर पाऊस..
उधाणलेल्या चेहऱ्यावर
धुवांधार झेललेला सैरभैर पाऊस...
गझलेतून मधुर गीतातून
ऐकू येणारा सुरेल पाऊस...
हुरड्यातून,भाजलेल्या कणसातून
घमघमणारा पाऊस...
चहाच्या कपातून उष्णस्पर्शाने
वाफाळलेला पाऊस..
अंगणात टिपटीपणारा
निरागस थेंबातला पाऊस..
छञीवर धो-धो पडणारा
धारेतला धडधाकट पाऊस...
हिरव्या निळ्या झाडीतून
गवताच्या पातीतून
मनभरुन रड
लेला पाऊस...
नदीतून सागरात
प्रवाहातून समुद्रात
थेंबाथेंबातून मिठीत येवुन
विसावलेला पाऊस..
विरहाच्या जळत्या वाटेला
विझवणारा पाऊस..
प्रियकर भेटीच्या तळमळीने
हृदयात खोलवर पेटलेला पाऊस...
विचारांच्या काहीलीतून
विराट अर्थघनात
काव्यात विरघळलेला पाऊस...
चातक व्यथेच्या भन्नाट प्रतिक्षेत
आषाढात गवसलेला
श्रावणात बरसलेला
कावराबावरा सैराटलेला पाऊस....!!!!!!