शाळा मित्र बाके
शाळा मित्र बाके
प्रिय कान्हा,
कृष्णास...
तु जरी देव असलास तरीही मला तू मित्र म्हणूनच सर्वात जवळचा वाटतोस...
तु कोणत्याही रुपात गोजीरवाणा , लोभसच दिसतोस...आणि म्हणून तू कृष्ण सखा शोभतोस...मयुरपंख लेवून भाळी, सारे रंग उधळतोस आकाशी...आकाशाची निळाई तर तुझ्या ठाई ठाई...
तु सखा राधेचा, मीरेचा हळवा कृष्ण सखा द्रौपदीचा .नटखट नंदलाला यशोदेचा... कोणत्या कोणत्या रूपात साठवू अन् आठवू... बासरीतून पसरवतोस मधूर मंजीऱ्यांचा स्वर अन् वेड लावतोस गोप गोपीकांना...
अरे आजकालची मुलं, तुझ्यासारख्या खोड्याही नाही करत...असतात सतत कसल्यातरी विवंचनेत नाहीतर मोबाईल वर... तुझ्या सारखे सवंगडी भेटतात त्यांना फक्त FB नाहीतर WhattsApp वर..दुध,दही, लोणी तर कधीच बंद झालयं डाएटच्या नावाखाली...तुझ्या खोड्यांनी यशोदा सुखवायची पण आम्हाला तेही सुख नाही रे घेता येत... करियरच्या नावाने आमची बाळ असतात ,शाळेत, पाळणाघरात, नाहीतर होस्टेलवर...बाकांच्या तुरुंगात साजरे होते त्यांचे बालपण...
तुझ्या नटखटतेची मीही आहे वेडी... अन् बासरीच्या सुरांची प्रेमदिवाणी...
तुझं मित्रप्रेम सुदाम्याच्या अन् पेंद्याच्या परिघात बांधलय... त्यावेळी नव्हते स्टेटस अन् बरोबरी... आजकालची मुलं मैत्रीही करतात स्टेटस पाहून... तुझ्या मैत्रीणी राधा , मीरा अन कृष्णसखी द्रौपदी साऱ्या स्रीत्वाच्या मर्यादेत तरीही अमर्याद ...
दही दुधाच्या चोऱ्या तर केल्यासच ,भलत्या वयात गोपिकांची छेड काढलीस. सुदामा, अर्जुन यांचा मित्र तू होतासच,पण द्रौपदीचाही सखा झालास . आणि हे सुंदर नातं तू भारतीय स्त्रीला दिलेस. स्त्रीला मित्र ही संकल्पनाच नव्हती तुझ्या आधी आपल्याकडे... तो स्त्रीचा पिता, पुत्र, किंवा पती असावा, अशी आपली समाज रित !
सारंच बदललयं रे आता... तुझ्यासारखा कृष्ण सखा कधीतरी येऊन दुर्योधनांच्या गराड्यातून सोडवशील म्हणून कित्येक स्त्रिया तुझ्या वाटेवर नजर लावुन बसल्या आहेत...तु होतास म्हणून द्रौपदीला वाचवलेस... पण आतातर निष्पाप कळ्या तर जन्माला येण्याअगोदरच खुडल्या जात आहेत... त्यांना कोण वाचवणार?
तुझं सारच अर्तक्य...
खर म्हणजे तुझं नाव घेतल्यावर तू मानवी रूपात समोर येतच नाही, तुझ्या नावाबरोबर येते आकाशाची गडद निळाई...आणि एक लहरणारं मोरपिस... तुझं तुझ्या भाळी सजलेलं लाडकं मोरपिस...
खरं सांगू कान्हा तुझ्या इतका मानवी जीवनात मिसळलेला कुठलाच देव नाही!
सारे प्रचलित नियम तू मोडलेस... जन्म मथुरेत देवकीच्या पोटी, पण वाढलास नंदाघरी... राधेचा तू राधेय झालास ... प्रेमाचे प्रतिक म्हणून राधेचच नाव येत तुझ्या नावाआधी...
कान्हा तु असं करतोस का...? तु तुझा दहीहंडीचा इव्हेंट बघायला ये... आवडेल तुला... आवडलं तर रहा ना ...! तुही थक्क होशील आमचा जोश पाहून...
शांताबाई पासुन शीला, मुन्नी सगळी गाणी चालतात... DJ च्या तालावर नाचलं ना की तेवढंच जगण्याचं भान हरपतं आणि दहीहंडीचा इव्हेंट साजरा करता करता, जगण्याचा उत्सव मात्र राहून जातो... पथकातले गोविंदाही तुझ्या गोवर्धन पर्वतासारखे उंच उंच थर लावतात, बक्षिसाच्या तर कधी इर्षेच्या लालसेने... अन् अनेक नंदलाला जायबंदी होतात कायमचे... तरीही तु ये आवडेल तुला...
नाहीतरी गीतेत तु "यदा यदा ही धर्मस्य" म्हणून परत येण्याचे वचन दिले आहेस ना? पण आता युध्दासाठी नको .... नात्यांना सजवण्यासाठी ये...
संपूर्ण मानवजात एक आहे, सर्व विश्व एक कुटुंब आहे असा पुल तयार करण्यासाठी ये... आणि हो येताना बासरी नक्की घेऊन ये म्हणजे तुझ्या बासरीच्या मंजीऱ्यांचा दरवळ जगभर पसरेल आणि सर्वधर्मसमभाव... सर्व विश्व एक कुटुंब होईल...
येशील ना नक्की ?