STORYMIRROR

Seema Gandhi

Abstract Others

4  

Seema Gandhi

Abstract Others

पुन्हा पाऊस...

पुन्हा पाऊस...

1 min
280

खुणावतोय...

तो खिडकीपल्याड...

प्राजक्ताच्या घनगर्द नजरेने न्याहाळतोय...

कालिदासाचे सूत्र सांभाळत, तो त्याचाच दूत होऊन आलाय...

मेघसूक्त गाताना पाहिलंय मी त्याला...

क्षणभर अनोळखी वाटला...

मी भेटत नाही तोवर जाणार नाही म्हणाला...

किरणांचे पक्षी नजरेआड करून ...

आभाळ भरून वाहतोय...

दारी माझ्या परतपरत थेंबाची रांगोळी काढून खुणावतोय...


तो सृजनाचा सखा...

कालिदासाचा मेघ...

पर्जन्यराज बनून आलाय...

थोडीतरी स्पेस दे ना...

किती विनवतेय त्याला...

किती हा छळवाद...

एकदा नाही भेटले तर किती हा उभा दावा...

आता ढगांची वाद्ये...

विजेचे नर्तनही घेऊन आलाय साथीला...

न्याहाळतोय अजूनही वेडा मला...

अशाने पानाफुलांत अडकलेले श्वास माझे कसे होतील रे मुक्त...

आधीच मी रिक्तहस्त...

ऐक ना रे...

तुझ्या आठवांच्या पागोळ्यांचा गंध...

तुझ्या आनंदाच्या स्पर्शाचा बंध...

या जन्मात तरी तुटेल काय... रे

अंतःकरणात रूजलेला तुझा तो चैतन्याचा पसारा...

समुद्रकाठावरचा तो स्पर्श ओलेता शहारा...

मी ओळखते रे तुला...

तुझ्या रिमझिम सरी...

कधी संयमी शांत...

कधी रुद्र प्रपात...

कधी खळाळ निळाशार...

पण मनाला लुभावते तुझी गाज...

तुझ्या निळाशार लाटांची रुणझुण...

मोहवतो तो हळवा किनारा...


ओल्या चिंब रेतीत आगंतुक उमटणारी पावलं...

अन् प्रतिबिंबित होणारं सारंच... निळंशार...

एक निळं साम्राज्य...

मांडलिक साऱ्या नद्या... झरे...

सगळीकडे फक्त तूच...

चक्रवर्ती सम्राट...

अनभिषिक्त...

समुद्रा तूच असतोस रे सगळीकडे...

या थेंबात...

या पावसात...

या हिरवाईच्या रंगात...


सौ.सीमा शिरीष गांधी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract