शोध 'माझा' चालू आहे
शोध 'माझा' चालू आहे
जन्म माझा कशासाठी ? मृत्यू मला पुसत आहे,
सावधान म्हणतो मृत्यूला..शोध 'माझा' चालू आहे ।।धृ•।।
इकडे कधी आड तर तिकडे कधी विहीर आहे,
उघड्याबोडक्या डोळ्यांपुढे कसला तरी तिमिर आहे.
स्वतःच्याच हिमती मनगटावर क्रोध माझा चालू आहे,
विश्वास उठलाय सगळा..शोध 'माझा' चालू आहे ।।१।।
वाट एक निवडताना चूका सारख्या होत आहेत,
आशेचा सूर्य उगवण्यापूर्वीच दिशा पारख्या होत आहेत .
दिशाहीन आयुष्याची वेडी सजा चालू आहे,
संपेल ही सजा कधीतरी ..शोध 'माझा' चालू आहे ।।२।।
योग्य वाट निवडताना उशीर जरा झाला आहे,
वेळेबरोबर मोफत म्हणून पैसा सारा गेला आहे.
बंद पडलेल्या डोक्यामध्ये प्रश्नांचा बाजा चालू आहे,
बाजा चाललाय फूटून,तरी शोध 'माझा' चालू आहे ।।३।।
रक्तामधली धमक माझी विसरून मी गेलो आहे,
डोळ्यांमधली चमक माझी हरवून मी मेलो आहे.
पण ध्येयसाधनेच्या आशेने मेलेलं मन बोलू पाहे,
पल्ला अजून बाकी आहे..शोध 'माझा' चालू आहे ।।४।।