डोळ्यात माझ्या
डोळ्यात माझ्या
दिसावी कशी ओल डोळयात माझ्या
कुणी जात नाहीच खोलात माझ्या
तसा मीच बरसून जाणार आहे
ऋतू फक्त यावेत गावात माझ्या
कितीदा तरी हारली आवडीने
असावी तिला ओढ खेळात माझ्या
तशी धार नजरेत आलीच आहे
अता ठेवतो तीच भात्यात माझ्या
सुखाच्या घरी दुःख नांदत नसावे
व्यथेचेच दे दान पदरात माझ्या
कितीदा तरी ठार केले मला मी
तरी काळ येणार दारात माझ्या
भुकेचे किती लाड करतो बघा मी
मला लागते पोट ताटात माझ्या