कॉफी..
कॉफी..
आपले क्षण, आपल्या आठवणी
बघ ना किती सारे स्मरते
तुझ्याविना रे जीवनात माझ्या
अन् कुठे काय उरते..?!
अचानक बरसल्या पाऊसधारा
सरींत चिंब चिंब भिजते
पावसात भिजते, धुंद होते
ही धुंदी कणाकणात मुरते
स्मरते मज ती पहिली कॉफी
भेट ही आपली स्मरते
पुन्हा पुन्हा या आठवणींनी
मन हे माझे झुरते
असीम असे प्रेम हे आपले
सहवासात तुझ्या विरघळते
दूर तू जाता नयनी अश्रू
नकळत सारे घडते
अंतरात तू सदैव वसतो
जीवन भरून उरते
मनाची नाव किनारा होते
अन् मी तुझ्यात उतरते

