प्राक्तन
प्राक्तन
भर दुपारी , आग सूर्याची
तिला सवय , विटा नेण्याची
दिन एकेक , जाई निघून
आस आशेची , जाई विरुन
घर एकेक , होई बांधून
तप्त सूर्याच्या , झळांमधून
नसे पोटात , अन्नाचा कण
पोटासाठी , करी वणवण
ऊन सोसून , काळीठिक्कर
कधी संपेल , सारा कहर
दिसामागून , दिस उगवे
मनी विचार , नवा पालवे
आता कळले , अशी दुपार
आयुष्यात , नाही ढळणार
नशीब फाटके , एखाद्याचे
प्राक्तन तयाला , म्हणायचे
