STORYMIRROR

Prathamesh Pathak

Abstract

4  

Prathamesh Pathak

Abstract

बुल्स आय

बुल्स आय

1 min
2.1K

हल्ली 'लो-रेजोल्युशन' कविता सुचू लागल्यात,

मग छापायला जातो मनावर

तेव्हा 'पिक्सलेट' होतात! 


हल्ली लिहितो कविता आणि त्या

एकदा वाचूनच समजू लागल्यात


तो 'एक' धक्का होता ज्याने 

महात्म्याला गाडीतून ढकललं आफ्रिकेत

आणि जिथून निर्माण झाला एक नवा इतिहास

तसा एक धक्का मिळायला हवा

एखाद्या शब्दाला ... एखाद्या कवितेत!


शब्दात होत असेल का 'बिग बँग'?

असल्यास ते जाणवत असेल का?

जाणवल्यास ते पुन्हा पुन्हा घडवता येईल का?

मी करतही नाही इतका विचार,

कारण मी कवी आहे शास्त्रज्ञ नाही!


हल्ली लिहू लागलोय शास्त्रशुद्ध कविता

टाळ्या किती मिळतात याचा मार्केट रिसर्च करून,

पेरतो विरोधाभास,

पाऊस पाडतो यमकांचा...


आता हवंय मला

एक यंत्र जे ऐकू शकेल कोऱ्या कागदाचे चित्कार

हो चित्कार....

कारण चित्कारही सुरात असतात

जितकी वेदना मोठी तितका वरचा 'नि' चोख लागतो!


कविते... ये पुन्हा एकदा

माझ्या प्रतिभेच्या 'डार्ट बोर्ड'वर

'बुल्स आय' मार!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Prathamesh Pathak

Similar marathi poem from Abstract