कविता माझी
कविता माझी
कविता माझी
समाजातल्या छोट्या मोठ्या घटना टिपते।
जे जे दिसते डोळ्यांना ते टिपून घेते।
काळजातल्या व्यथा वेदना मांडत जाते।
कविता माझी शब्दरुपाने झरू लागते।।१।।
झाडे, वेली, चंद्र, तारका, पशू, पाखरे
सागर, सरिता, खग, नग, मोठे सुंदर सारे
निसर्ग दर्शन सांज सकाळी सदैव करते।
कविता माझी शब्दरुपाने झरू लागते।।२।।
परंपरांचे जोखड मोठे खांद्यावरती।
सदैव होते मानवतेची गळचेपी ती।
प्रसंग सारे पाहून माझे मन हळहळते
कविता माझी शब्दरुपाने झरू लागते।।३।।
प्रत्येकाच्या मनात असते एक भावना।
भोग भोगले किती सोसल्या इथे यातना।
व्यथा यातना, अनुभवांना, इथे मांडते।।
कविता माझी शब्दरुपाने झरू लागते।।४।।
कधी अचानक संकट येता भय जीवाला
वैतागाने फासावरती कुणी लटकला
डोळ्यांमधून अश्रूंची ती नदी वाहते।
कविता माझी शब्दरुपाने झरू लागते।।५।