पाचोळा
पाचोळा
विचारांच्या सुक्या पाचोळ्यावर
पाऊल पडताच
चुर्र चुर्र आवाजाने
मन दचकतं ...
गळलेले विचार परत
फेर धरतात,
मनाच्या डहाळीला राहिलेली देठं
उगीचच बोचतात ...
पाचोळा, का बरं विलीन होत नाही
पटकन भूतकाळात ?
तिथेच राहून, घालतो धिंगाणा
वर्तमानात...
निचरा व्हायला जावा लागतो
काही काळ,
विचारांनीं भटकायचं असतं का
असं रानोमाळ?
वणवण करून हाती तर काही
येत नाही,
चुर्र चुर्रचा पडघम मात्र
थांबत नाही...
धीराच्या सिंचनाने जिरवायचा
असतो व्रात्य पाचोळा,
मनाच्या डहाळीला, फुटेल नक्की
कोंब आगळा वेगळा.