तू माझी अर्धांगिनी
तू माझी अर्धांगिनी
लाभला तुझ्यामुळे अर्थ माझ्या जीवना
तूच माझी अर्धांगिनी तूच माझी प्रेरणा
किती त्याग तुझा झटते संसारासाठी
कोण इतके करते इथे कोणासाठी
तूच मुकी अन् तूच बोलकी भावना
तूच माझी अर्धांगिनी तूच माझी प्रेरणा
संतापतो अन् वाटेल ते बोलुनी जातो
उगा पुरुषार्थ माझा उफाळूनी येतो
परी समजून घेते तू माझी कामना
तूच माझी अर्धांगिनी तूच माझी प्रेरणा
नात्यातली सारी गुपिते तुलाच ठावी
ढळतो ना संयम होते कधी न हावी
कशी सोसते तू जगाची अवहेलना
तूच माझी अर्धांगिनी तूच माझी प्रेरणा
बघ बोलक्या झाल्यात भिंती तुझ्यासवे
घर आपुलेच वाटे रोज नित्य नवे
किती लावतेस तू जीव घरादारांना
तूच माझी अर्धांगिनी तूच माझी प्रेरणा
स्वागताला सदैव तत्पर मनातुनी
उपाशी जात नाही कोणी या दारातुनी
द्रौपदीच्या थाळीतून वाढे अन्नपूर्णा
तूच माझी अर्धांगिनी तूच माझी प्रेरणा
लिहलेच नाही अजुनी मी असे काही
समर्पणाचा तुझ्या जे शब्द भार वाही
तरी केवढे कौतुक माझे तुला, कळेना
तूच माझी अर्धांगिनी तूच माझी प्रेरणा
संस्कारातुनि साकारले तू या घराला
पावित्र्याने जपते घराच्या उंब-याला
दृष्ट न लागो कधी हीच माझी प्रार्थना
तूच माझी अर्धांगिनी तूच माझी प्रेरणा
