STORYMIRROR

Deepali Thete-Rao

Abstract Classics

3  

Deepali Thete-Rao

Abstract Classics

मोगरा

मोगरा

1 min
211


कसा आहेस रे? 

कसा असणार? 

अजूनही तू सोडून गेलीस त्या वाटेवरच... शरीराला निसर्ग धर्म पाळावेच लागतात 

पण मन... ते तर तिथेच आहे. 

कितीही ठरवलं तरी मनाची भाषा मौनातच. 

वरकरणी "बराय" म्हणतो मी. 


तू?

कशी वाटते? 

छानच चाललंय की तुझं.

 एकाच शहरात आहोत आपण. 

कळते की ख्यालीखुशाली. 

यशाची चढती कमान. 

वाढता व्यवसायाचा पसारा. 

 एकुलतीएक सून

 तुझ्या अंगाखांद्यावरील श्रीमंतीच्या खाणाखुणा. 

तुझा रूबाब पाहून, ऐकून होतोच.... दूरवरून. 

छानच चाललंय की......

तेव्हाही अन् आताही. 

बरच झालं नाही...

 माझ्यासारख्या सडाफटिंगाशी 

नाहीच केलंस लग्न. 

योग्यच होता बाप तुझा, 

कसं देणार होतो मी.... 

हे असलं वैभव

 पण खरच, 

राहिली असतीस का ग? 

माझ्याबरोबर साध्या, छोट्या घरात? 

खूप पैसा नाही पण

 प्रेम, समाधान मणभरून दिलं असतं.... 

तसही त्याला काय किंमत राहिली असती

 जर परिस्थितीचे चटके 

सोसावे लागले असते तुला. 

वेडाच होतो मी... 

आहे अजूनही. 

खरच योग्यच होता तुझा बाप. 

एक सल सलतो मनात कधीचा

विचारू? 

सुखी आहेस ना ग? 

की हा हास्याचा मुखवटाच चढविलेला

ए सांग ना ग! 

खरतर तुझ्या नकाराचीच अपेक्षा मनाला.. 

अजूनही तुझ्या मनात कुठेतरी 

असेन का ग मी? 

माझ्याशिवाय सुखी असशील? 

वेडी अंधूक आशा .....

आहेच अजूनही धगधगती. 


कशी वाटते? 

उत्तरादाखल तिचा परत तोच प्रश्न. 

नाही कळत

तूच सांग

माझं सुख काय 

 ठरवण्याचा मला अधिकारच नाही 

तेव्हाही... आणि आजही

हास्यमागे दडलेली नजरेतील व्यथा

तुला कळलीच नाही 

तेव्हाही... आणि आजही....


ती निघाली 

आणि दिसला...

 त्या श्रीमंतीच्या खाणाखुणांवर 

न शोभेसा तिने माळलेला मोगरा...

 त्याचा लाडका. ....

तो पहातच राहिला.. बेभान

डोळ्यात साचणारे धुके परतवत. 

तिचीही नजर ओलावलेली ...

झटकन फिरवली 

अन् चढवला मुखवटा पुन्हा तिने. 

निघाली.. 

तो तिथेच गलितगात्र झालेला...

न विचारलेल्या प्रश्नांनाही मिळालेल्या उत्तरांनी.... 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract