पुर्वीचा काळ
पुर्वीचा काळ
पुर्वीचा काळ बाबा
खरच होता चांगला
कुठे होती गाडी ?
कुठे होता बंगला ?
चालत चालत आम्ही
स्टेशनवर यायचो
रेल्वेच्या डब्यातून
आॅफिस साठी जायचो
डब्यात ही असायची
थोडी फार गर्दी
सह प्रवासी असायचे
सर्व कलेचे दर्दी
भजन, गाणी म्हणत
रोज चालायचा प्रवास
वेळ मजेत सरायचा
नसायचा कसला त्रास
संध्याकाळी सुद्धा
हसत खेळत यायचो
दुसऱ्या दिवसासाठी
पुन्हा निरोप घ्यायचो
घरी पण आनंदात
व्हायचे माझे स्वागत
बायको मुले असायची
दारात वाट बघत
>
आणलेला खाऊ बघायला
मुले गलका करायची
आई त्यांची प्रेमाने
हलके रागे भरायची
सात वाजता घरात
दिवा बत्ती करायचे
देवापुढे हात जोडून
मनाचे श्लोक म्हणायचे
एक तास पुढला
अभ्यासाचा असायचा
मौज मस्तीत मुलांचा
गृहपाठ संपायचा
नऊ वाजता बरोबर
एकत्र जेवणं व्हायची
गप्पा गोष्टी करत
पंगत मस्त रंगायची
वामकुक्षी करून सर्व
दहा वाजता झोपायचे
झोपुन लवकर उठण्याने
ज्ञान आरोग्य लाभायचे
आता मात्र सगळे
विपरीत घडत असते
जमाना बदलला आहे
हेच सतत जाणवते