माझ्या मनातला पाऊस
माझ्या मनातला पाऊस
भेटला पाऊस जीवनाच्या
वेगवेगळया वाटेवर ...!
अनेकविध रुपाने...,
रुजला मनात खोलवर...!
बालपणी पाऊस गवसला..
अल्लड, निरागस, हट्टी....!
कुतुहलाच्या अंगणी..
भिजून जमविली गट्टी....
कागदांच्या होड्या सोडल्या...
आनंदानं आभासात भिजलो...!
निरागसतेच्या पाण्यात यथेच्छ..,
जिज्ञासा ,ऊत्साहाने खेळलो...!
तारुण्याच्या काठावर पाऊस...
प्रेयसीच्या रुपाने भेटला...!
तारुण्यसुलभ आकर्षणानं....,
अोलेत्या भावनेन स्वप्नांत भिजला..!
हसवलं ,रडवलं पावसानं....,
आयुष्याच्या वेगळ्या टप्प्यावर ...!
सुख दुःखाच्या तालावर....,
नाचवलं भावनांच्या सरिंवर....!
प्रौढत्वाकडे झुकणारा पाऊस...,
पावसाळाच वाटू लागला...!
सुखदुःखांच्या चटक्यांनी भिजून... ,
वास्तवतेचं भान देतबरसू लागला..!
संकटाची वावटळ ,संघर्षकाटे...,
ऊभेजागोजागी, दलदलीचे फाटे..!
मार्ग काढला त्यातूनही संयमाने...,
दुःखाचे मेघ कित्येकडोळ्यात दाटले!
अशा वेगवेगळ्या परिस्थितीत..,
पाऊस वेगवेगळया रुपात दिसला.!
कधी मित्र ,सखी ,आई ,बाप भाऊ,
सगे सोयरे गोतावळ्यात तो रमला..!
कातरवेळी आयुष्याच्या पाऊस..,
आठवणींमध्ये जास्त भिजला..!
हृदयातून दाटून आलेले मेघ...,
डोळ्यांतून माया ममतेने बरसला.!
कातरवेळी मृत्यूची सावली दाट..,
लेकरांच्या मायापावसाची हवी ऊब!
गलितगात्र शरीरानेही पुकारला संप !
रोगाच्या व्याधींनी भिजलो चिंब चिंब!