रात्र पावसाळी
रात्र पावसाळी


धुंद वादळाची होती
रात्र पावसाळी होती
नुकताच पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला होता. गुलाबी थंडी सुरू झाली होती, त्या थंडीतच शराबी वाराही वाहत होता. सर्वत्र धुंद धुक्याची चादर पसरली होती. गुलाबी थंडी,शराबी वारा आणि धुंद धुके या सा-यांनी सारी सृष्टी मोहरून गेली होती. आजूबाजूच्या झाडांच्यावर आणि गवताच्या पात्यावरची दवबिंदूची माळ चमकत होती.लांबून कुठूनतरी पारिजातक, मोगरा आणि इतर रानफुलांच्या सुवासांनी पुरा आसमंत बहरून गेला होता. धुक्यात पायाखालची पायवाट हरवून गेली होती. झाडांवरच्या पक्षांचा कलरव सृष्टीला जाग आणत होता आणि दाहीदिशांनाही जाग आणत होता . चिंब ओले झालेलं रान ती रानावनातली ओलती पायवाट आणि त्या पायवाटेवरच्या धुंद रानफुलांनी बहरलेली पायवाट, ती करवंदाची जाळी, जाळीवर लगडलेली काळसर लाल रंगाची करवंद छान दिसत होती. विश्व सुखाचं चांदणे या पायवाटेवर आणि सा-या वातावरणात पसरलंय की काय असा भास होत होता.
तसं तर या ठिकाणी मी दरवर्षीच येतो, आणि प्रत्येकवेळी इथं एक वेगळाच अनुभव येत असतो. आता या वेळेला काय अनुभव येतोय ते माहिती नव्हतं.
अश्या प्रसन्न आणि सुंदर वातावरणात मी पुढं पुढं जात होतो. जंगल आणखीनच घनदाट होतं होते. अगदी स्वर्ग सुख अनुभव.पुढं पुढं जात होतो तसतसा दोन्ही बाजूंनी गर्द झाडी वाढतच होती. वेगवेगळ्या प्राण्या-पक्षांचे आवाज उगीचच भीती निर्माण करत होते. क्षणापुर्वी ही पायवाट म्हणजे स्वर्ग वाटत होती, पण तीच आता नरक आहे की काय अशी शंका येऊ लागली.
आता मी कुठल्याश्या अंधार गल्लीतून तर जात नाही ना ! अशी शंका यायला लागली. तिथे होती फक्त असीम शांतता आणि शांततेत दडलेली एक अनामिक गुढता. एखादा ऋषी ती अनामिक गुढता आणि अवकाशातला शांततेचा नाद अनुभवतोय की काय असा भास होत होता.
तीच गुढता अनुभवत मीही पुढं पुढं चाललो होतो,अर्धाअघिक अंधारगल्ली मी पार केली होती आणि अचानक दुड दुड पावलांचा आवाज आला,मी क्षणभर श्वास रोखला आणि आवाजाचा कानोसा घेत घेत आवाजाच्या दिशेकडे पाहात त्याच्या दिशेनं जाऊ लागलो, अचानक समोर भरगच्च स्वप्नांचा एक उसासा न् हुंदका माझ्या पायाजवळ आला आणि मला निरखून पाहू लागला, आणि मला म्हणाला ' अरे काय पाहतो आहेस,अरे ये जवळ, बस
जवळ माझ्या '....
मी सुरूवातीला घाबरलो, बावचळलो. आणि थोडसं कुतूहल वाटायला लागलं. त्याचे इवलेसे डोळे आणि त्या डोळ्यांतली ती चमक थोडीशी ओळखीची वाटली आणि थोडसं निरखून पाहिल्यावर त्याची ओळख पटली.' अरे हा तर माझाच उसासा,हुंदका. आणि मी त्याच्याबरोबर चालू लागलो. चालता चालता आमच्या गप्पागोष्टी सुरू झाल्या. तो मला म्हणाला ' किती दिवस झाले, कुठं गेला होतास,आणि काय तुझे डोळे का एवढे खोल गेलेत ,आणि डोळ्यां खालचा भागातील काळपटपणाही वाढलाय, अरे तुझी ख्यालीखुशाली विचारायला आलोय'
मला विसरलास काय ? सगळं काही ठीक आहे ना ???
त्याच्या या प्रश्नांच्या भडिमाराने मी पुरता हललो आणि मला आठवलं माझी आई गेल्यापासून मी निटसा झोपलेला नाही. बरेच दिवस काय महिने न् वर्ष झाले हे आईला समजले असावे आणि म्हणूनच ती मला अश्या काहीशा प्रकारे मला भेटायला आली असावी, माझी चौकशी करायला आली असावी .. मी तिच्यात आईला पाहू लागलो आणि गप्पा मारू लागलो. गप्पा मारत मारत खूप पुढे आलो..
त्या दिवसा नंतर मी ठरवलं होते की आता आपल्या जीवनात आता या हुंदक्यांना आसवांना आपल्या जीवनात स्थान नाही. आपल्याला आपले कुटुंब पहिल्यांदा आणि नंतर सर्व काही.म्हणून त्यानंतर आपले सुख समाधान. म्हणून मी कधीच या हुंदक्यांना आणि आसवांना स्थान दिले नव्हते.
'काळजी घे स्वतःची आणि माझ्या सुनेची आणि नातवाची असे काहीसे बोलता बोलता तो आला तसाच अचानक त्या धुक्यात हरवून गेला. मी त्याला खूप शोधले पण तो काही दिसलाच नाही.
प्रत्येक पावसाळ्यात मी या ठिकाणी येतो कधीतरी भेटेल पण तो पुन्हा कधी दिसालाच नाही. याच्या आपुलकीने चौकशीची पुन्हा पुन्हा आठवण येत राहते. त्याचे ते अनपेक्षित येणे,त्याचे इवलेसे डोळे ती डोळ्यांतली चमक आणि बरंच काहीबाही. मला हे सुंदर दृश्य पुन्हा पुन्हा अनुभवायचे आहे.
इथे येत असताना हा विचार नसतो. पण आल्यावर मात्र ते आठवल्याशिवाय राहवत नाही.
अजूनही माझ्या डोळ्यांसमोर ते सुंदर दृश्य जात नाही.
ते डोळे, त्याच्या शब्दातली काळजी, माया, आपुलकी शब्दात सांगता येत नाही. कुण्या चित्रकारांच्या रंगाच्या फटका-यातने देखील चितारता न येणारे ते सुंदर दृश्य मी काळजात माझ्या अंतापर्यत जपून ठेवणार हे मात्र नक्कीच.