लाव्हा
लाव्हा
अंगभर हिरवळ पांघरलेल्या
तिच्या मनाचे पदर
मी कुतूहल म्हणून उलघडत गेलो..
एक एक करत सरकवत आवरण
मी हृदया समीप येऊन ठेपलो..!!
जाणवले तेव्हाच मनाला
की ही हिरवळ केवळ वरवरची
वास्तवात बोजड मुळांनी
तिचे अंतःकरण पोखरलेली..
रक्त मांसास चटावलेली ती मुळं
मिळेल ती जागा व्यापून
थेट काळजात रुतलेली..!!
मी हलवले केवळ हृदयास
अन् उसळला सुप्त लाव्हा
त्याच बोजड मुळाखाली
तिने महत्प्रयासाने थोपवलेला..
अन्
पाहिला एक अनामिक दगड
उसळलेल्या लाव्ह्यात सहज वाहताना
काही कळते न कळते तोच
क्षणात विरघळलेला..!!
