रस्ते
रस्ते


सहज गप्पांच्या ओघात
ती बोलून गेली
जणू काळजातला हळवा कोपरा
टटोलून गेली।
म्हणाली,
हळूहळू संपणाऱ्या ह्या प्रवासात
आयुष्याच्या एका वळणार
कधीतरी असं वाटू लागते
की पुनश्च करावा प्रवास
नव्या उमेदीने आणि नव्या ध्येयाने।
पण जुना रस्ता पुन्हा खुणावू पाहतो,
नव्या स्वरूपात पुन्हा भेटू पाहतो
तेव्हा द्विधा मनाचा कोंडमारा सुरू होतो।
मी हसलो अन् म्हणालो,
तसा रोजच असतो नवा प्रवास
मात्र अंगवळणी पडलेले रस्ते
सहजासहजी सुटत नसतात।
तसेच भुलवणारे आणि चकचकीत दिसणारे
ते सारेच रस्ते
दिसतात तसे मुळीच नसतात।
अन् आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
प्रत्येक वाटसरूच्या वाट्याला,
असे रस्ते येतच असतात।
मात्र योग्य त्या दिशेने जाणारे
आपल्या मुक्कामी पोहचवणारे
त्यातले नेमके रस्ते
आपणच आपले निवडायचे असतात।