कडुलिंबाच्या सावलीमध्ये
कडुलिंबाच्या सावलीमध्ये
कडुनिंबाच्या सावलीमध्ये
शांततेत राहायचे आहे बसून
वाजवून दाखवशील का पुन्हा
सावळ्यासारखी प्रेमधून... ॥१॥
बांधावरच्या कामावर
मिस्तऱ्याचा होता किती दबदबा
दोनला सुटी होताच जेवणाची
आपण सोबतीने खायचो डबा... ॥२॥
तुझ्या भातात मिसळायचं
माझ्या डब्यातलं कालवण
भुर्रकन उडून गेल्या क्षणांची
आता फक्त राहिली आठवण... ॥३॥
आठवड्याच्या बाजाराला
दोघंही जायचो सोबत
ओळखीच्या भाजीवाल्याकडून
कोथिंबीर घ्यायचो मोफत... ॥४॥
मिळायचा गुळाचा चहा
थिएटरमागच्या टपरीवर
कपात खारी बुडवून खाताना
अचानक यायची पावसाची सर... ॥५॥
काही कारण नसतानाही
पुन्हा भरशील का रागे ?
तुझ्या मनातल्या मैनेसाठी
वळून पाहशील का मागे ?... ॥६॥
आता तू नसताना सोबत
झाला केविलवाणा संसार
परतावेसे वाटले तर
सदैव उघडे आहे दार... ॥७॥