एका खवय्याचे प्रेमगीत
एका खवय्याचे प्रेमगीत
हृदयी माझ्या स्थान ना केलेस तरी चालेल गं
पण पोटाची पोकळी भरलीच तुज पाहिजे.
च्! कली काश्मीर की नसलीस तरी चालेल गं
चकली मात्र खुसखुशीत जमली तुज पाहिजे
वडाच्या प्रदक्षिणा ना केल्यास तरी चालेल गं
वड्यांच्या तळणाचा कधी कंटाळा न तुज पाहिजे
गुलबदन नसलीस तू, तरी मजला चालेल गं
गुलाबजाम करण्यात हातखंडा तुज पाहिजे
शराब तव डोळ्यातली ना पाजली तरी चालेल गं
शरबते विविध पिलवण्या जमले तुज पाहिजे
<p> तीर सोडून विद्ध तू ना केलेस तरी चालेल गं
खीर मात्र गोडशी जमली तुज पाहिजे
लाड माझे इतर कमी केलेस तरी चालेल गं
लाडू गोमटे वळण्याची हातोटी तुज पाहिजे
केशरचना मजसाठी ना केलीस तरी चालेल गं
केशरभात वेळोवेळी रांधला तुज पाहिजे.
सुंदर्या अन् अप्सरा लाथाडतो तुजसाठीच गं
पण एवढे मागणे माझे पुरवले तुज पाहिजे.