"नवप्रयास"
"नवप्रयास"


काही नवीन डाव मांडले
काही नवीन डाव जिंकले
जुन्या सोंगट्या जुनेच गडी
संदर्भ खेळाचे निराळेच निर्मीले
काही नवीन पालवी
नव्या रोपास फुटावी
अंकुरले बीज फुलात
जुन्याच खिडकीत बहरावे
काही नवीन दिसावे
नयन सुलोचन व्हावे
जुन्या आसवांनी मग
आकाश धुवून निघावे
काही सुखद सुगंध
नाविन्याचे यावे
नवलाईच्या नावीकासोबत
पैलतीरी वाहावे
काही नवीन लाटा
किनारीच्या आशेच्या
एकाकी भ्रमर नवा
प्रेमात एका गुलाबाच्या
काही नवीन जखमा
नव्या वेदनेच्या व्हाव्या
हुंकार दिलास्यासा
मीच मला द्यावा
मी नवीन जगावे
जीवन जाणीवेचे
उमगल्या सार्या खुणा
आठवणीस परत खेचे
कां कळेना चुकले
अंदाज जगण्याचे..
नवीन शोधते आता
नवप्रयास श्वासाचे..!