माझ्या गावच्या भूमीत
माझ्या गावच्या भूमीत
माझ्या गावच्या भूमीत, सोन्याच पिक पिकतं।
राणा माझा राबतो अन, कष्टाचं फळ दिसतं।।
माझ्या गावच्या भूमीत,व्हती समदी हिरवी शेतं।
माती माय समद्यांची, लेकराले सांभाळीत।।
माझ्या गावच्या भूमीत,वरुणाची किरपा सदा।
प्रेम भुमि आसमंताच इथ हो बहरत।
लेक मायेचा मातला, माय झाली हो नापिक।
लेकराचे हाती वसा, तवा व्हयी ती सुपीक।।
चूक कळता लेकाला, काम करी सैराट।
तवा झाली गावामंदी, समदीकड भरभराट।।