स्वावलंबी
स्वावलंबी


भाग १
*स्वावलंबी*
"राम राम गणप्या. अरे, सकाळी सकाळी शेतावर जायच सोडून इथं कुठं निघालाय?"
"माझ्या ह्या लेकीला शाळेत भरती करायचे हाय. म्हणून शाळेला चाललोय."
"अन् तुझा पोरगा दत्तू, त्याला नाही शाळेत टाकणार?"
"तो मोठा हाय, आनी मला शेतात भी मदतीस कुणी तरी हवंच ना! नंतर शिकेल तो."
"अरे, पोरीला शिकवून काय करणार? वयात आली की सासरलाच पाठवणार ना? मग चुल-मुलच करावं लागेल ना? काय होईल उपयोग ह्या शिक्षणाचा"?
"ते मला नाय माहीत. हिची आय बोलली पोरीलाच शाळेत टाकायचे."
"तिच्या आयला काय कळतंय. तुला कळाया हवं."
"माझ्या कारभारणी पुढं माझं काय भी चालत नाय. तिच्या बापानं तिला दोन बुकं शिकवलं ना? मी अडाणी हाय, पण माझी कारभारीण हुशार हाय. ती भल्याकरताच सांगत असल."
"बरं बाबा. जा जा शाळेत टाक तिला." असे म्हणून रामू आपल्या वाटेने गेला. गणप्या शेवंताला घेऊन शाळेच्या रस्त्याला लागला.
"बापू, किती लांब जायचे आहे? पाय दुखायला लागले माझे. उचलून घे ना."
"बरं माझ्या रानी, ये खाद्यांवर बस." असे म्हणून गणप्याने तिला खाद्यांवर घेतलं व तो झपझप चालू लागला.
थोड्याच वेळात तो शाळेकडे पोचला. शेवंताला खाली ठेवून तिचा हात धरून तो शाळेत गेला. शाळेच्या बाहेरच शिपाई होता. त्याने विचारले, "इथं कशाला? कुणाला भेटायचे आहे?"
गणप्या म्हणाला, "माझ्या पोरीला शाळेत टाकायचे हाय."
"इथच थांबा. मी सरांना सांगून येतो." असं म्हणून शिपाई आत गेला व थोड्या वेळाने त्यांना मुख्याध्यापकांच्या खोलीत घेऊन आला.
मुख्याध्यापकांनी गणप्याचे हसून स्वागत केले. "वाह! मुलीला शाळेत घालायचे ना? छान करतात. मुलांना शिकवायलाच पाहिजे."
"हिची आय दोन बुकं शिकलीया. तिनच हट्ट धरलाय. हिला शिकवायचा."
"मग फारच छान करतात त्या. आपल्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलेच आहे, एक बाई शिकली की सगळं कुटुंब शिक्षीत होत असतं म्हणून, ते खरंच आहे."
मुख्याद्यापकाने शिपायाला सांगून सहाय्यक शिक्षिकेला बोलावले. तिला शेवंताचा प्रवेश दाखला भरायला सांगितले. गणप्याला माहिती विचारून तिने दाखला भरला. नंतर त्यावर गणप्याचा अंगठा लावून घेतला व नंतर तो दाखला मुख्याध्यापकांच्या हवाली केला व त्या आपल्या वर्गावर गेल्या.
मुख्याध्यापकांनी शिपायाला, शेवंताला पहिलीच्या वर्गात नेऊन बसवायला सांगितले.
शिपाई शेवंताला घेऊन वर्गावर निघाला तेव्हा शेवंता तिच्या बापूकडे पाहून रडू लागली. गणप्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला व म्हणाला, "शिकून शानी हो बाय."
नंतर गणप्याने मुख्याध्यापकांना विचारले, "साब, किती पैका द्यावा लागेल? जमेल तसं देत जाईन म्या."
"अहो, पैसे वगैरे काही लागत नाही. इथे तिला आम्ही जेवण पण देणार आणि इथे शिकते म्हणून तुम्हाला पैसे पण देणार.
सरकारचाच कायदा आहे. त्याचा लाभ घ्यायलाच हवा. गावात आणखी कोणी असतील तर त्यांना पण शाळेत शिकायला सांगा. पोर हाताखाली कामाला मिळतयं म्हणून त्याच्यावर जुलूम करू नका. मुलांना शिकू द्या. सरकारच्या योजनेचा फायदा सगळ्यांना घ्यायला सांगा."
हे सगळे एकून गणप्या चकीतच झाला आणि त्याला खूप आनंद ही झाला. "शेवंताला न्यायला कधी यायचे साब?"
"हां, तिची शाळा पाचला सुटेल तेव्हा या."
"लई उपकार केले साब,"असे म्हणून गणप्या मुख्याद्यापकांचे
पाय धरून नमस्कार करायला झुकला. त्याबरोबर मुख्याद्यापकांनी खाद्यांला धरून त्याला उठवले,"अहो काय करतायं? मी काही उपकार करत नाही तुमच्यावर. सरकारने दिलेलेच काम मी करतो आणि त्या बद्दल मी पगार ही घेतो ना! चला या तुम्ही व गावच्या बाकीच्या मुलांचा ही विचार करा."
"बरं बरं साब," म्हणून गणप्या आपल्या घरी यायला निघाला.
गणप्या घरी यायला निघाला होता. पण विचारांच्या तंद्रीत असल्याने तो शिवाराच्या रस्त्यावर आला. शेतावरच्या बांधावरून चालताना त्याला शेतात काम करणारी बरीच मुले दिसली. ती मुलं सुद्धा शेवंता व दत्तूच्याच वयाची किंवा थोडीफार मोठी असतील. आपल्या आईबाबांच्या शेतीकामाला हातभार लावत होती. शेतातले काम करायला मुलांना शिकवायची गरज लागत नव्हती. मोठ्यांचे काम बघून ती आपसूकच शिकत असतात. गणप्या चालत चालत स्वतःच्या शेतावर पोचला. तिथे त्याचा लेक दत्तू निंदणी करत होता. त्याचं बापूकडे लक्ष जाताच तो उठून उभा राहिला. "बापू, शेवंताला पोचवली शाळेत? राहील ती एकटी? रडणार नाही ना?"
"कशाला रडेल! लई झक्कास आहे तिथं. मास्तर बोलले तिथं जेवण भी देणार आहेत. दत्तू तू भी जाशील का शाळेला? मग तुम्हा दोघांना संगती जाता येता येईल."
"आणि तुमच्या संग शेतात कोन काम करील?"
"मी आणि तुझी आय मिळून करू की!"
"मग मी भी जाईन की. शेवंताला पण संगत होईल."
"चल, आता घरला जाऊ. लई वखत झालाय. तुझी आय भी वाट बघत बसली असल."
"दत्तू तुझ्या संगती आणखी तुझे मित्र भी असतील त्यासनी पण शाळेत घेऊन जा. त्या मोठ्या मास्तरांनी सगळ्यांना घेऊन यायला सांगितले हाय."
"पण बापू सगळे काम करतात नव्ह. शाळेत जायला लगले तर शेतीच काम कसं व्हायच?"
"ते नंतर बघू, अगोदर पोरांना शिकायचे हाय का नाय ते बघ."
असे बोलत बोलत बाप लेक घरी पोचले. तेव्हा रखमा नदीवर पाणी आणायला गेली होती. थोड्या वेळाने ती आली. आल्या आल्या तिनं शेवंता बद्दल विचारलं. शेवंताच्या शाळेची सगळी खबर गणप्याने तिला सांगितली. तिथं शेवंताला जेवण मिळणार आणि वरून सरकार पैसै पण देणार म्हटल्यावर तिला खूप आनंद झाला. घरातल्या देवाच्या तसबीरीकडे पाहून तिने देवाचे आभार मानले.
"चला, तुम्हासनी भुका लागल्यात नव्ह? वाढते आता."
भाजी भाकरी घालून बाप लेका समोर तिने ताटे सरकावली.
जेवताना गणप्याने दत्तूला पण शाळेत टाकायचे असे रखमाला सांगितले.
"अवो मग, पैका कसा पुरेल? दोघांना शाळेत घालायला तेवढा पैका नको का?"
"अगं, तेच तर सांगतोयं. शेवंताला शिकायला पैका नाही लागणार. उलट ती शाळेत जाते म्हणून महिनाकाठी तिलाच पैका मिळणार."
"काय सांगताय!"
"व्हय, म्हणून दत्तूला भी शाळेत शिकाया घालूया. त्या मोठ्या मास्तरांनी पोरां पोरीना शाळेत आणाया सांगतलं हाय. अगोदर आपून आपल्या दत्तूला घालुया. मग बाकीना आपन तयार करू."
"अहो, दत्तू सारखी सगळी पोरं शेतात काम करताय नव्ह? मग शेतात कोण काम करेल?"
"पोरांना शाळेत टाकायचेच. ती पण मग शहरातल्या लोकांवानी रूबाबदार होतील. त्यांच्या वाटणीचे काम आपन दोघं मिळून करू."
"सगळे कसे तयार व्हतील?"
"सगळ्यांच आपन नंतर बघू. अगोदर शेवंता व दत्तूला शाळेत घालुया."
"जसे तुम्ही म्हनाल तसे."
शेवंतासारखे दत्तूला शाळेत जायला मिळणार म्हणून सगळी खूश झाली. दत्तूला तर जास्तच आनंद झाला.
*क्रमशः*