मरण
मरण
आज मरण यातना सोसत आहे
काय चुकले माझे देवाला विचारत आहे
सुंदर रूप देऊन... का तुझे चुकले देवा?
या रूपामुळे आज मरण तुला मागत आहे
आई बाबांची परी बाहुली सारखी दिसते
सर्वजण तोंड भरुन कौतुक करायचे
बाहुली मोठी होताच वाईट नजरेने छळायचे
चौकातले टपोरी नको नको ते बोलायचे
आशिक बनून रोज मागे माझ्या लागायचे
भररस्त्यात हात धरला म्हणून मी गाल लाल केला
त्याचा बदला म्हणून माझ्यावर ऍसिड हल्ला झाला
काय चुकले माझे जमान्याला विचारत आहे
जमाना काय उत्तर देणार?.. तो तर मलाच दोष लावत आहे
मुलीने मुलीसारखं राहावं मलाच सुनावत आहे
ह्याच जन्मी नव्याने पुनर्जन्म घेणार आहे
एकाच जन्मात मी दोन जन्म जगणार आहे
चेहरा बदलला तशी मीही बदलणार आहे
स्त्रीला दुबळी समजणाऱ्या पुरुषाला
मर्दानी बनून दाखवणार आहे
पुनर्जन्म नको देवा...
ह्याच जन्मात दुर्गा बनुन जगायचे आहे
दुर्गा बनून जगायचे आहे...

