मन चिंती ते वैरी न चिंती
मन चिंती ते वैरी न चिंती


आज अचानक आभाळ दाटून आले . सोसाट्याचा वारा , विजेचा कडकडाट , जोरदार धो. धो.पावसाला सुरुवात झाली. वाऱ्याचा जोर असल्यामुळे मोठं मोठी झाडे वाकडेतिकडे होऊन हालत होते. एवढ्यात एक जुने झाड कडकडाट आवाज करत जमीनीवर कोसळले. त्या आवाजाने प्रभाच्या काळजात धस्स झाले. अशा कातरवेळी तिचे मन कावरे बावरे झाले होते. काय करावे तिला काही सुचत नव्हते. संध्याकाळ झाली तरी प्रकाश अजून घरी आला नव्हता तसा तिने दुपारी फोन करून त्याची चौकशी केली होती. लवकरच सर्व कामे आटोपून मी घरी येतो . काळजी करू नकोस म्हणत प्रकाशने तिच्या बोलण्या अगोदर फोन कट केला. प्रभाला काही बोलता आले नाही.
आज सकाळपासूनच प्रभाला अस्वस्थ , उदास वाटत होते.एक अनामिक भितीने तिच्या मनात काहूर माजले होते.काही अशुभ तर घडणार नाही ना? छे. छे. तिने स्वत:च्या मनाला समजावले पण काही केल्या वाईट विचार तिच्या डोक्यातून जात नव्हते. बहिणाबाई म्हणतात." मन वढाय वढाय, उभ्या पिकातल ढोर । किती हाकला हाकला , फिरी येते पिकावरी " तसंच आज प्रभाच झाले होते. अनेक विचारांचे वादळ तिच्या मनात घोंघावत होते. अंगातील मरगळ झटकून तिने हाततोंड धुतले. देवाला दिवा लावला. हात जोडून देवाला प्रार्थना केली. देवा आज मन खूप अस्थिर झाले आहे , सर्व सुखरूप असू दे. मनातील विचार बाजूला व्हावे म्हणून तिने रेडिओ लावला .त्यावर तुकाराम महाराजांचा अभंग चालू होता. " मन माझे चपळ न राहणे निश्चळ । घडी एक पळी स्थिर नाही "। इतक्यात फोन खणखणला . तिने धावतच जाऊन फोन उचलला. फोन प्रकाशचा होता पण बोलणारी व्यक्ती मात्र दुसरीच होती. हॅलो मी इन्स्पेक्टर सान
प बोलतोय हा फोन ज्या व्यक्तीचा आहे त्याच्या गाडीला अपघात झाला आहे . शेवटचा फोन तुम्हाला केला होता यांनी म्हणून आम्ही या नंबरवरून तुम्हाला फोन केला. आपण यांच्या कोण आहात? प्रभाच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. मोठ्या मुश्किलीने ती म्हणाली हे माझे पती आहेत. सगळे ठीक आहे ना ? इन्स्पेक्टर म्हणाले मॅडम तुम्ही ताबडतोब हाॅस्पिटला या. फोन कट झाला. प्रभाला पायाखालची जमीन सरकल्याचा भास झाला.आपण काय ऐकले यावर तिचा विश्वास बसत नव्हता. " मन चिंती ते वैरी न चिंती " अशा परिस्थितीत तिने परत एकदा फोन करून खात्री करून घेतली. मॅडम तुम्ही लवकरात लवकर इकडे या .मग आपण बोलू म्हणत इन्स्पेक्टरने फोन ठेवला.
प्रभाने ताबडतोब भावाला फोन करून बोलावून घेतले. रामला पाहताच तिने जोरात हंबरडा फोडला.माझा प्रकाशा म्हणत घडलेली घटना सांगितली. भावाने तिला कसाबसा धीर दिला. चल आपल्याला निघायला हवे. दोघे ताबडतोब हाॅस्पिटलमध्ये पोहचले.समोर खूप गर्दी जमली होती. धावतच दोघे जवळ गेली. पांढऱ्या कापड्यात गुंडाळलेला मृतदेह बघून प्रभाला धक्काच बसला.रामने हिमत करून मृतदेहावरचा कपडा बाजूला केला.तसा जोरात ओरडला प्रभा हा प्रकाश नाही. प्रभाला जरा हायसे वाटले. " तो प्रकाश नव्हता ." मन चिंती तो वैरी न चिंती ". किती वाईट विचार आज तिच्या मनात येत होते. तेवढ्यात इन्स्पेक्टर मला म्हणाले मॅडम हे तुमचे पती . हातापायाला जखमा झाल्या आहेत, काळजी घ्या.या जखमा कालांतराने बऱ्या होतील ही पण मनातल्या जखमा खोलवर रूजलेल्या असतात. बेडवर सुखरूप असलेल्या प्रकाशला पाहून प्रभाने हात जोडून मनोमन देवाचे आभार मानले.