श्रावण
श्रावण
मास श्रावण श्रावण
पाणी ओथंबून आले
भोळ्या शंकराच्या पायी
भक्त आनंदून गेले
हर्ष मनात दाटला
किती नटावं गं बाई
शालू हिरवा नेसून
झोका उंच सखी नेई
लई फसवा श्रावण
ऊन दारात पडले
मागे वळून पाहता
चिंब सरीने भिजले
इंद्रधनू सप्तरंगी
कसे तोरण आभाळी
बाळ तान्हुले गं माझे
त्याची चिखलाची खेळी
सृष्टी जाहली नवरी
छटा हिरवी लेवूनी
मोर वरातीत नाचे
गोड कोकिळेची गाणी
सण घेऊन श्रावण
दही हंडीचा सोहळा
घास भरवी कृष्णाई
लाडक्या बालगोपाळा
बैल खिल्लार गं माये
पोळा श्रावणात नाहे
झूल पांघरून थाट
कसा गाव त्याला पाहे
मला श्रावणी साजणा
तुझी मिठी धुंद हवी
सरी धावुनीच येता
लाज गुलाबी रे हवी
ऐसा श्रावण बरसे
मोह मनाला गं लागे
माझ्या प्रेमाच्या संसारी
सुख श्रावणाचे मागे